मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर गुरु चिचकर यांनी केली आत्महत्या; सुसाईड नोटमुळे उडाली खळबळ!

25 Apr 2025 16:45:50
 
Guru Chichkar
 (Image Source : Internet)
मुंबई :
नवी मुंबईतील नामवंत बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर (Guru Chichkar) यांनी शुक्रवारी पहाटे स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. त्यांच्या आत्महत्येमागील कारण म्हणजे मुलावर सुरू असलेली चौकशी आणि त्यामुळे होत असलेला मानसिक तणाव, असं सुसाईड नोटमधून स्पष्ट झालं आहे.
 
घरातच घेतलं टोकाचं पाऊल-
गुरु चिचकर हे नवी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात एक मोठं नाव मानलं जात होतं. शुक्रवारी पहाटे सुमारे 6:30 वाजता त्यांनी स्वतःच्या घरातच आपल्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि उद्योग वर्तुळात एकच खळबळ उडाली.
 
सुसाईड नोटमुळे उघड झालं कारण-
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना चिचकर यांच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये विशेषतः मुलावरील प्रकरणांमुळे आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या जाचामुळे ते तणावाखाली होते, असं नमूद करण्यात आलं आहे.
 
मुलगा नविन चिचकर ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या-
गुरु चिचकर यांचा मुलगा, नवीन चिचकर, सध्या फरार असून तो देशातील एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) त्याच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये तपास करत आहे. या चौकशीदरम्यान गुरु चिचकर यांच्यावर अनेक प्रकारचा दबाव टाकला गेला, असं सुसाईड नोटमधून दिसून येत आहे.
 
तपासाला नवी दिशा-
या आत्महत्येमुळे आता पोलीस तपासाचं चक्र वेगाने फिरण्याची शक्यता आहे. चिचकर यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या अधिकाऱ्यांविरोधातही चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0