(Image Source : Internet)
मुंबई:
जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे नुकताच एक भीषण दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 26 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचाही समावेश होता. या दुर्दैवी घटनेने देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात निर्णायक पावलं उचलण्यात आली आहेत.
हल्ल्यात वीरमरण आलेल्या आदिल सय्यद हुसेनचा शौर्यपूर्ण प्रयत्न-
हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या आदिल सय्यद हुसेन या तरुणाने आपल्या प्राणांची पर्वा न करता इतर पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी त्याने त्यांच्यावर झडप घालून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, त्यावरही गोळीबार झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
एकनाथ शिंदे यांचा संवेदनशील निर्णय-
या धक्कादायक घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाले. आदिलच्या शौर्याची दखल घेत शिंदे यांनी त्याच्या कुटुंबाला सरकारतर्फे घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
पाकिस्तानविरोधात भारताची ठोस कारवाई-
दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सिंधू जल करार थांबवण्यात आला असून अटारी बॉर्डर तात्पुरती बंद करण्यात आली आहे. शिवाय भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना तातडीने देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे आणि त्यांनी भारतासोबतचा व्यापार थांबवण्यासह वाघा बॉर्डर देखील बंद केली आहे.