महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा;कामठीत ठेका कामगारांसाठी ५ हजार घरे

    25-Apr-2025
Total Views |

Chandrashekhar Bawankule
 
नागपूर:
राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज कामठी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात म्हाडाशी संबंधित एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलताना काही महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.
 
बावनकुळे यांनी सांगितले की, कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पांतील ठेका कामगारांसाठी ५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत किफायतशीर दरात दिले जाणार आहे. त्याचबरोबर, कामठी शहरात २,५०० नवीन घरांची बांधणी करण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. तसेच, भीलगाव आणि खैरी परिसरात ५ हजार घरांचे बांधकाम सुरु असून, त्यात ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
तसेच, नागपूर शहर आणि जिल्ह्यात ५,५०० तयार घरांची वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, याचे वितरण मुख्यमंत्री घरकुल योजनेअंतर्गत केले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
 
हिसलॉप कॉलेज जवळील म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू होणार असून, यामध्ये अतिक्रमण हटवणे आणि झोपडपट्टीवासीयांना घरे देणे यासाठी योजना राबवली जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त झोपडपट्टीवासीयांची यादी तयार करत असल्याचे ते म्हणाले.
 
राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांसाठी घरांचे बांधकाम सुरू केले असून, मुख्यमंत्री एकूण २० लाख घरांना मंजुरी देत आहेत. तसेच, केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आणखी १० लाख घरांच्या बांधकामाची योजना राबवली जाईल. यामुळे एकूण ३० लाख घरांचे लक्ष गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
बावनकुळे म्हणाले की, पुढील दोन वर्षांमध्ये राज्यभरात या घरांची बांधणी पूर्ण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचे पॅकेज आणले गेले आहे. यामधून नागपूर जिल्ह्यात एकही खेतमजूर झोपडपट्टीत राहणार नाही आणि प्रत्येकाला पक्की घरे मिळतील, असे आश्वासन त्यांनी दिले.