"'मी पुन्हा येईन' या वाक्यावर त्यांनी पुस्तकच लिहावं; अजित पवारांचा फडणवीसांना मिश्किल टोला

25 Apr 2025 16:01:49
 
Ajit Pawar on Devendra Fadnavis
 (Image Source : Internet)
पुणे:
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच त्यांच्या परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. पण कधी कधी त्यांच्या विनोदी शैलीनेही उपस्थितांना गडगडाट हास्याचा अनुभव दिला आहे. अशाच एका प्रसंगात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या विधानावर मिश्किल पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.
 
पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना अजितदादांनी फडणवीसांच्या प्रसिद्ध 'मी पुन्हा येईन' या विधानाचा संदर्भ घेतला. ते म्हणाले, फडणवीसांनी ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ या विषयावर पूर्वी पुस्तक लिहिलं होतं. आता मी त्यांना सुचवणार आहे की, त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ या नावाचं पुस्तक लिहावं. मी मुंबईत गेल्यावर त्यांना स्वतःहून सांगणार आहे. त्यांच्या या मिश्किल टिप्पणीमुळे संपूर्ण सभागृहात हास्याची लाट उसळली.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी अनेक व्यासपीठांवर ‘मी पुन्हा येईन’ असं ठामपणे सांगितलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही त्यांना सत्ता मिळवता आली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता मिळवली आणि फडणवीस विरोधी बाकावर गेले.
 
‘मी पुन्हा येईन’ हे त्यांचं विधान नंतर अनेक राजकीय चर्चांचा आणि टीकांचा विषय बनलं. अनेकदा हे वाक्य चिमटे काढण्यासाठी वापरलं गेलं आणि आता अजित पवारांनीही त्याच विधानाचा विनोदाने उल्लेख केल्याचे चर्चा रंगल्याच्या पाहायला मिळत आहे.
Powered By Sangraha 9.0