भारतात ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर बंदी; पाक कलाकारांच्या सहभागावर सरकारची कडक भूमिका

25 Apr 2025 17:32:13
 
Abir Gulal
मुंबई :
जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या आगामी हिंदी चित्रपटावर भारतात थेट बंदी घालण्यात आली आहे. ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास भारत सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
 
फवाद-वाणीचा ‘अबीर गुलाल’ भारतात होणार नाही प्रदर्शित-
फवाद खान आणि वाणी कपूर अभिनीत ‘अबीर गुलाल’ हा एक प्रेमकथा आधारित चित्रपट असून तो लवकरच भारतीय प्रेक्षकांसमोर येणार होता. मात्र आता हा चित्रपट भारतात कुठल्याही माध्यमातून प्रदर्शित केला जाणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरात पाकिस्तानविरोधी भावना अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
 
पहलगाम हल्ल्याबद्दल फवाद खानने सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत लिहिलं, "माझं मन हेलावून गेलं आहे." वाणी कपूरनेही आपली भावना मांडत, “मी हादरले आहे,” असं म्हटलं. मात्र, भारतीय जनतेने या प्रतिक्रियांना फारसं महत्त्व न देता चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जोरात केली.
 
मनसेचा पुन्हा एकदाच विरोध सफल-
या चित्रपटाला मनसेकडून आधीपासूनच जोरदार विरोध करण्यात येत होता. फवाद खान याला बॉलिवूडमध्ये स्थान देण्याविरोधात मनसेने चित्रपटगृह मालकांना इशारे दिले होते. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मनसेची भूमिका अधिक दृढ झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
 
पूर्वीही झाले आहेत असे निर्णय-
2016 मधील उरी हल्ल्यानंतरही पाकिस्तानी कलाकारांवर अनौपचारिक बंदी लादण्यात आली होती. आता पहलगाममधील अलीकडच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पाक कलाकारांच्या भारतातील सहभागावर पूर्णविराम दिला जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Powered By Sangraha 9.0