(Image Source : Internet)
मुंबई:
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अजूनही अनेक प्रवासी तिथे अडकलेले आहेत. यामुळे काश्मीरमध्ये जाण्याचे बुकिंग मोठ्या प्रमाणात रद्द होऊ लागले आहे.परंतु, अशा भीतीच्या पार्श्वभूमीवर मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने) एक ठोस आणि धाडसी निर्णय घेतला आहे. काश्मीरला सहल आयोजित करण्याचे मनसेने ठरवले आहे.
मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितले, “ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही स्वतःपासून सुरुवात करत आहोत. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तिथे जायला आम्ही अजिबात घाबरत नाही.
देशपांडेंनी असंही सांगितलं की, “दहशतवाद्यांचा उद्देशच हा आहे की काश्मीरचं पर्यटन ठप्प करावं आणि तिथली अर्थव्यवस्था कोलमडून जावी. परंतु आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तिथे पर्यटनाला चालना दिली, तर हाच त्यांच्या कटाला प्रत्युत्तर ठरेल.”
भारत एक आहे, आणि कायम राहील-
देशपांडेंनी काश्मीरमधील एका स्थानिक तरुणाचं उदाहरण दिले. त्याच्याकडे एकच गाडी होती, पण पर्यटक येऊ लागल्यावर त्याने अजून दोन गाड्या घेतल्या. आता जर पर्यटनच बंद झालं, तर त्या गाड्यांचे हप्ते कोण भरणार?
त्यांनी पुढे सांगितलं की, काश्मीरमध्ये आता रोजगार निर्माण होत आहेत, उद्योग वाढत आहेत, त्यामुळे दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळणं जवळपास बंद झालं आहे.
पर्यटन हेच देशभक्तीचं नवं रूप-
आपल्या सैन्यावर आणि प्रशासनावर विश्वास ठेवायला हवा. दहशतवाद्यांच्या विरोधात आपण काश्मीरमध्ये फिरून ठोस संदेश द्यायला हवा की भारत एक आहे, आणि कुठलीही भीती आम्हाला परावृत्त करू शकत नाही, असे देशपांडेंनी ठामपणे सांगितले.
तसंच, काही एअरलाइन्स कंपन्या श्रीनगर ते मुंबई भाड्यांमध्ये मोठी वाढ करत आहेत, यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, “देश जोडायचा असेल, तर अशा वेळी सहकार्य हवं. लोकांना गळा कापणं हे अशा कंपन्यांना शोभत नाही, असे देशपांडे म्हणाले आहेत.