(Image Source : Internet)
मुंबई :
काश्मीरमध्ये घडलेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकमय वातावरण आहे. मात्र अशा गंभीर प्रसंगी महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्षांमध्ये श्रेय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या चढाओढीमुळे राजकीय वादाला पुन्हा हवा मिळाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, शासनाच्या एका सुरात काम न करण्याच्या वृत्तीवर कडवट शब्दांत टीका केली आहे.
एकच सरकार की दोन वेगवेगळी यंत्रणा?
गिरीश महाजन काश्मीरला गेलेल्या काही तासांतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तेथे दाखल झाल्याने राऊतांनी सडेतोड प्रश्न उपस्थित केला – "एकाच विषयासाठी दोन वेगवेगळे मंत्री तिथे जाण्याची गरज काय? हे सरकार एकसंघ आहे की वेगवेगळ्या दिशांनी चालणारे?" त्यांनी शिंदेंच्या कृतीवर सवाल उपस्थित करत हे पॅरलल प्रशासन चालवलं जातंय का, असा थेट प्रश्न केला.
"दु:खद प्रसंगी राजकारण टाळा"
राऊत म्हणाले की, संकटाच्या वेळी राज्याने एकसंघ होणं आवश्यक आहे. अशावेळी राजकीय लाभाची गणितं न मांडता सरकारने ठाम निर्णय घ्यावा आणि सर्व घटकांनी त्यात सामील व्हावं, हीच योग्य भूमिका ठरते. "राजकीय प्रतिष्ठा आणि श्रेयाच्या नाट्यावर भर न देता, प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी समन्वय साधणं आवश्यक आहे," असं ते म्हणाले.
विरोधकांचा सरकारला पाठिंबा-
"आम्ही विरोधक असूनही या कठीण काळात सरकारच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो," असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं. त्यांनी सर्वपक्षीय बैठकीच्या आयोजनाचं स्वागत करत, अशा चर्चा वास्तवाला स्पर्श करत असतील तरच त्यांना अर्थ आहे, असं स्पष्ट केलं.
विशेष अधिवेशनाची गरज-
काश्मीरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन सर्व पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. “राष्ट्रहिताच्या दृष्टीने विरोधकांच्या सूचनांना स्थान देणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले. राऊतांच्या मते, अशा वेळी जबाबदारीची जाणीव असलेली भूमिका घेणं हेच सरकारचं खरं कर्तव्य आहे. राजकीय कुरघोडी करण्याचा क्षण हा नव्हे, हे लक्षात घेणं काळाची गरज असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं