भारताच्या आत्म्यावर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा

24 Apr 2025 15:07:43
 
PM Narendra Modi
 (Image Source : Internet)
पाटणा :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बिहार दौऱ्यावरून ठोस आणि कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे.पाटणा येथे गॅस, ऊर्जा आणि रेल्वे क्षेत्रातील १३,४८३ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात पहलगाम हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ दोन मिनिटांच्या मौनाने केली. त्यानंतर त्यांनी देशात निर्माण झालेल्या संतापाचा सूर पकडत हल्लेखोरांना कठोर आणि कल्पनाशक्तीपलीकडील शिक्षा देण्याची घोषणा केली.
 
"हा हल्ला काही केवळ पर्यटकांवर नव्हता, हा भारताच्या आत्म्यावर झालेला वार होता," असे सांगत त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "जे भारताविरुद्ध कट रचतात, त्यांना अशी शिक्षा दिली जाईल की ती त्यांना स्वप्नातही वाटली नसेल."मोदी यांनी पुढे स्पष्ट केलं, "जे थोडंफार उरलं आहे त्यांच्या ताब्यातील, तेही आता मातीस मिळवण्याची वेळ आली आहे."या भाषणातील त्यांचे ठाम आणि आक्रमक शब्द सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. नागरिकांमध्ये सरकारच्या या कणखर भूमिकेमुळे समाधानाची भावना उमटत आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचा मोठा राजकीय आणि सामरिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0