आम्हाला टिकल्या काढून...; पीडितेने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

    24-Apr-2025
Total Views |
 
Sharad Pawar about harrowing experience
 (Image Source : Internet)
पूणे :
पर्यटनासाठी काश्मीरमधील पहलगामला (Pahalgam) गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामध्ये पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे हे देखील आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी पीडित गणबोटे कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने आपला जीवघेणा अनुभव उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, “आम्ही शांततेत फिरत होतो, आणि अचानक गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी आमच्यावर धार्मिक दबाव टाकत अजान म्हणण्यास भाग पाडलं. आम्ही महिलांनी घाबरत अजान म्हणायला सुरुवात केली, तरी आमच्यासमोरच त्यांनी पुरुषांवर गोळ्या झाडल्या.”
 
त्या पुढे म्हणाल्या, “मी आणि इतर महिलांनी भीतीपोटी कपाळावरच्या टिकल्या काढून टाकल्या आणि अल्लाहू अकबर उच्चारायला सुरुवात केली. पण अतिरेक्यांना काहीही दया आली नाही. त्यांनी माझ्या नवऱ्यासह इतर सर्वांवर निर्दयपणे गोळ्या झाडल्या.”
 
घटनेवेळी तिथे एक स्थानिक मुस्लिम युवकही उपस्थित होता. त्याने दहशतवाद्यांना प्रश्न विचारला की, “हे लोक काय दोषी आहेत?” पण त्यालाही जीव गमवावा लागला. हल्ल्याच्या आठवणी सांगताना त्या महिला आणि उपस्थित लोक भावविवश झाले.
 
त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही घोड्यावरून खाली उतरत होतो, पण पाय चिखलात अडकत होते. कसाबसा जीव वाचवत आम्ही पळत सुटलो. आमचे घोडेवाले आणि गाडीचालक दोघेही मुस्लिम होते. त्यांनी आमच्यावर माया केली आणि आम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहचवलं.”
 
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्रातील नागरिक:
अतुल मोने – डोंबिवली
संजय लेले – डोंबिवली
हेमंत जोशी – डोंबिवली
संतोष जगदाळे – पुणे
कौस्तुभ गणबोटे – पुणे
दिलीप देसले – पनवेल
 
या अमानुष घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. धार्मिक ओळखीवरून टार्गेट करून केलेले हे हत्याकांड धक्कादायक आहे. देशभरातून केंद्र सरकारवर कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढतो आहे.