(Image Source : Internet)
मुंबई :
काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) भागात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांच्या धर्माची विचारपूस करून त्यांच्यावर बेधडक गोळीबार करण्यात आला. यात 28 जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सलीम मर्चंट यांनी देखील आपल्या भावना थेट व्हिडीओद्वारे मांडल्या आहेत.
हिंदू असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले, हे कधीपर्यंत सहन करायचं?
सलीम मर्चंट म्हणाले, “ज्यांना गोळ्या घालण्यात आल्या, ते केवळ हिंदू असल्यामुळे मारले गेले. हे केव्हा थांबणार? मी स्वतः मुस्लीम आहे, पण अशा हिंसाचारामुळे आता स्वतःची ओळख लाजिरवाणी वाटते. काश्मीरमधील स्थैर्य पुन्हा खालावलं आहे आणि सामान्य जनतेलाच याचे भोग भोगावे लागणार आहेत.
बैसरन खोऱ्यातील डोंगर उतरताना दहशतवाद्यांनी पर्यटकांना वेढून, त्यांच्या धर्माची चौकशी करून गोळीबार केला. या घटनेवर बोलताना सलीम म्हणाले, हे हल्लेखोर मुस्लीम नाहीत, ते अमानुष दहशतवादी आहेत. इस्लाम अशा क्रौर्याला कधीच पाठिंबा देत नाही.” त्यांनी कुराणमधील 'सूरह अल-बकराह' या अध्यायातील आयत 256 चा दाखला देत सांगितले की, धर्मामध्ये जबरदस्तीला स्थान नाही.
अनेक कलाकारांचा निषेध-
सलीम मर्चंट यांचा व्हिडीओ प्रसिद्ध विनोदी कलाकार मुनव्वर फारुकीने देखील शेअर करत लिहिलं, “मी त्या निरपराध लोकांसाठी मनापासून प्रार्थना करतो.” या घटनेवर सोशल मीडियावर अनेक नामवंत कलाकारांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि अशा दहशतवाद्यांना कठोर शासन द्यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यामध्ये या प्रकरणावर सविस्तर माहिती देणार आहेत