(Image Source : Internet)
मुंबई:
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ जणांनी प्राण गमावले असून, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश आहे. दोन परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकत दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी निर्मूलनाची मागणी केली आहे.
"फक्त घुसायचं म्हणत राहू नका, आता निर्णायक कारवाई करा-
गंभीर हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, "पाकिस्तानात घुसायचं तर घुसा, पण या दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करा. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. या प्रकरणात मदतीसाठी पुढे आलेले अनेक मुस्लिम बांधवही होते. त्यामुळे या गोष्टीचा धार्मिक रंग देणं चुकीचं आहे.
ते पुढे म्हणाले,कोणतंही सरकार दहशतवाद्यांविरोधात पाऊल उचललं, तर संपूर्ण देश त्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
भारत सरकारची जोरदार कारवाई सुरू-
हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदी पाणी वाटप कराराला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात आले असून, पाकिस्तानच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत.
कश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई-
या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला असून, अनेक भागांमध्ये संचारबंदी सदृश स्थिती आहे. सुरक्षा यंत्रणांनी आता जोरदार कारवाई करत सुमारे दीड हजार लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.देशभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, आता जनतेची अपेक्षा आहे की केवळ निषेध न करता निर्णायक पावलं उचलली जातील.