नागपूरमध्ये उष्णतेचा कहर; 25 एप्रिलपर्यंत 'यलो अलर्ट' कायम

    23-Apr-2025
Total Views |

Heatwave wreaks
(Image Source : Internet) 
नागपूर:
शहर प्रचंड उष्णतेच्या झळांनी होरपळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (22 एप्रिल) शहरातील कमाल तापमान 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीपेक्षा 3 अंशांनी जास्त आहे. भारतीय हवामान विभागाने 25 एप्रिलपर्यंत ‘हिट वेव्ह’ अर्थात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे.
 
एप्रिल महिन्यात आतापर्यंत तीन वेळा तापमानाने 44 अंशांचा टप्पा पार केला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान 19 एप्रिल रोजी 44.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्यानंतर 20 एप्रिलला तापमान 44 अंश, तर 22 एप्रिलला 44.2 अंश इतके होते.
 
उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या हवामानात कोणतीही आर्द्रता प्रणाली सक्रिय नसल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.
 
हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की 25 एप्रिलपर्यंत तापमान 44 ते 45 अंशांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि थेट उन्हापासून बचाव करावा, असा सल्ला दिला जात आहे.