अमित शाहांचे लक्ष फक्त विरोधकांवरच; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संजय राऊत यांचे टिकास्त्र

    23-Apr-2025
Total Views |
 
Amit Shah Sanjay Raut
 (Image Source : Internet)
मुंबई:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) भागात मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला रवाना झाले. श्रीनगरमधील राजभवनात त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील आपला दौरा तात्काळ रद्द करत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अमेरिकेतील भेट मोडून परत आल्या असून आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्ल्यानंतर सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. एक्स (माजी ट्विटर) वर त्यांनी लिहिले, "अमित शाह यांचा संपूर्ण फोकस विरोधकांना संपवण्यावर आहे. देशाच्या सुरक्षेबाबत त्यांची भूमिका निष्काळजी आहे. सुरक्षा व्यवस्थेचा देवावर सोपवलेला भार आता देवालाही झेपत नाही."
 
सत्तेसाठी धडपडणाऱ्या नेत्यांनी राजीनामा द्यावा-
राऊत यांनी पुढे लिहिलं, "राजकीय कुरघोड्यांमध्ये मश्गुल असलेल्या मंत्र्यांना जनतेच्या सुरक्षेची काहीच फिकीर नाही. अशा लोकांनी देशावर उपकार म्हणून पदे सोडावीत." त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी अमित शाह, भाजप, आणि संयुक्त राष्ट्र संघाला टॅग करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
 
महाराष्ट्र सरकारकडून तत्काळ मदतविनंती-
हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी संवाद साधत जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानाची मागणी केली आहे. नायडूंनी लवकरच सर्व व्यवस्था करण्यात येईल, असा शब्द दिला आहे.