
(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम (Pahalgam) भागात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने देशभरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याचे सूत्रधार अद्याप समोर आले नसताना पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “या हिंसाचारामध्ये पाकिस्तानचा काहीही सहभाग नाही. आम्ही या प्रकारच्या क्रौर्याचा निषेध करतो.”
भारतावर आरोपांचा पाऊस –
या वक्तव्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी भारत सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत काही गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले, “हा हल्ला भारतातील अंतर्गत असंतोषामुळेच घडलेला असू शकतो. नागालँड, मणिपूर आणि काश्मीरसारख्या भागांमध्ये जनता अस्वस्थ आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारतातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवलं जातंय. त्यामुळे अनेक भागांत सरकारविरोधात रोष वाढत आहे.”
अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरूनही टीका-
ख्वाजा आसिफ यांनी भारतात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाविषयीही चिंता व्यक्त केली. “मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध समुदायाला अनेक प्रकारे छळाला सामोरे जावे लागत आहे. हे लोक आता या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे विधान चर्चेत-
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी दिलेलं एक विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. 16 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी काश्मीरविषयी पाकिस्तानच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली.काश्मीर हे पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, आमचे संबंध भावनिक आणि ऐतिहासिक आहेत. आम्ही काश्मिरी जनतेच्या लढ्यात त्यांचा पाठिंबा देत राहू,असे ते म्हणाले होते.