पहलगाम दहशतवादी हल्ला; हल्लेखोरांनी गोळीबार करण्याआधी पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट्स तपासले

    23-Apr-2025
Total Views |
 
terror attack
 (Image Source : Internet)
पहलगाम :
जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आणखी एक अंगावर शहारे आणणारी माहिती समोर आली आहे. काही माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी काही पुरुषांना कपडे काढायला लावून त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची तपासणी केली होती. हे अमानवी वर्तन आता देशभरात संतापाचा विषय ठरत आहे.
 
हल्ल्यादरम्यान, काही लोकांना धार्मिक श्लोक आणि कलमे पढवायला लावल्याचे देखील सांगितले जात आहे. हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकासह एकूण २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन परदेशी भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. घटनास्थळी सुमारे ५० राउंड फायरिंग करण्यात आल्याचे समजते.
 
हा भीषण हल्ला मंगळवारी दुपारी सुमारे २:३० च्या सुमारास बैसरन (Baisaran) परिसरात झाला. २ ते ३ दहशतवाद्यांनी पर्यटकांची कागदपत्रे तपासण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला आणि अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी नाव विचारून निवडक व्यक्तींना लक्ष्य केल्याचेही समोर आले आहे.
 
या घटनेदरम्यान, एक लष्करी अधिकारी आपल्या कुटुंबासह त्या परिसरात उपस्थित होता. त्याने प्रसंगावधान राखत इतर नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यास मदत केली.
 
देशभरातून या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अमानवी कृत्यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
 
या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातील अधिकृत कार्यक्रम रद्द केला असून आपला दौरा वेळेपूर्वीच संपवून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज, बुधवार २३ एप्रिल रोजी सकाळी भारतात पोहोचणार आहेत.
 
देश सध्या शोकसागरात बुडाला आहे आणि या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.