पहलगाम हल्ला; मृतांच्या परिवारांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

    23-Apr-2025
Total Views |
 
Pahalgam attack cm Fadnavis
 (Image Source : Internet)
मुंबई:
काश्मीरच्या बैसरन परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप जीव गमवावे लागले. 'छोटे स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रम्य भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर थेट हल्ला करत २६ जणांचा बळी घेतला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश असून, जखमींपैकी चारजण हेही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.
 
या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. तसेच काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येणार असून, त्याचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे.
 
दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरू केला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.