(Image Source : Internet)
उरी:
पहलगाममधील भ्याड हल्ल्याचे पडसाद अजूनही ताजे असतानाच, जम्मू-कश्मीरमधील उरी (Uri) भागात भारतीय सुरक्षा दलांनी सतर्कतेचे दर्शन घडवत मोठा अनर्थ टाळला आहे. बारामुला जिल्ह्यातील उरी नाला परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक घडली तेव्हा दहशतवादी भारतात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत होते.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी नियंत्रण रेषेजवळून घुसखोरीसाठी प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी वेळेवर हालचाल ओळखून कारवाईला सुरुवात केली. या दहशतवाद्यांनी प्रतिकार करत गोळीबार सुरू केला, त्यास भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरात दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबारासाठी वापरली जाणारी हत्यारे, स्फोटके, आणि युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे. ही सामग्री त्यांच्या घातपाताच्या योजनांची साक्ष देणारी आहे. अद्याप एक किंवा अधिक दहशतवादी या परिसरात लपलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे लष्कराकडून मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जात आहे.
संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर उरीमधील ही घटना अधिक गंभीर मानली जात असून, सुरक्षाबलांकडून कोणतीही ढिलाई न ठेवता कडक पावले उचलली जात आहेत.