(Image Source : Internet)
मुंबई:
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला.
या वेळी राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, राहुल कुल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या वेळी थोपटे यांनी काँग्रेसच्या विचारसरणीला जनतेपर्यंत पोहोचवले असले तरी पक्षाकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्यानेच पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट केले.
राजगड, भोर आणि मुळशी परिसरातील अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सोबत भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड अध्यक्ष नाना राऊत, मुळशी अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.
या प्रसंगी भोर तालुका भाजप अध्यक्ष जीवन कोंडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"काँग्रेसनेच आम्हाला दूर लोटले"
काँग्रेस पक्षासाठी आमच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे मेहनत घेतली. पण कालांतराने पक्षाकडून आम्हाला दुर्लक्षित करण्यात आले. विकासकामे थांबली, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. अखेर काँग्रेसनेच आम्हाला बाजूला सारल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत थोपटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.