(Image Source : Internet)
नागपूर :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे पर्यटकांवर झालेल्या निर्घृण हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, या भीषण घटनेचा काही मंडळींकडून राजकीय हेतूने वापर होत असल्याचे दु:ख महसूलमंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. अशा संकटकाळात सर्वांनी एकत्र येऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
बावनकुळे नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. "ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. अशा प्रसंगी राजकारण न करता, शहीदांच्या कुटुंबीयांना आधार देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे," असे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेत असून, योग्य ती पावले उचलली जात आहेत.
या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी सहा नागरिक हे महाराष्ट्रातील असून, त्यात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांतील नागरिकांचा समावेश आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, पीडित कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांना राज्यात परत आणण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कामाला लागली आहे.
बावनकुळे म्हणाले, “या हल्ल्यात धर्म पाहून निवडकपणे नागरिकांवर हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून येत आहे. हे देशात फूट पाडण्याचा प्रकार असून, त्याविरोधात आपण सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज आहे.”
कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता व पर्यटन वाढले होते. हेच काही देशविघातक शक्तींना खटकत असल्याने त्यांनी अशा घटना घडवून आणल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कठीण प्रसंगी पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,असेही त्यांनी सांगितले.