(Image Source : Internet)
नागपूर:
राज्य सरकारवर आर्थिक अडचणींचा आरोप करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. "सपकाळ अजून शिकण्याच्या वयात आहेत. परिपक्वता यायला वेळ लागतो," असा टोला त्यांनी सोशल मीडियावर लगावला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पोस्टद्वारे सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की, "राज्य आर्थिक संकटात आहे. ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा योजना थांबली आहे, लाडली बहिणींना दरमहा मिळणारे २१०० रुपये थांबवले गेले आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफीही अद्याप झाली नाही. मात्र चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटींचा खर्च केला जातो. आणि काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी हेलिपॅडवर १.५ कोटी खर्च करण्यात आले."
या आरोपांवर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, "सपकाळ यांचं वागणं अजूनही बालिश आहे. फक्त प्रसिद्धीसाठी चुकीचे आकडे सादर करणं दुर्दैवी आहे. जाहीरातीत नेमका खर्च १.५ कोटी दाखवला गेला आहे, मात्र ‘लोकमत’ वृत्तपत्रात टायपोमुळे ती रक्कम १५० कोटी वाटली. ही चूक माध्यमांची असून सरकारचा यात काही संबंध नाही."
ते पुढे म्हणाले, अशा चुकीच्या माहितीच्या आधारे समाजात संभ्रम निर्माण करणं ही जबाबदार नेत्याची लक्षणं नाहीत. सपकाळ यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे, आणि त्यासाठी संयम, समज आणि सत्य माहिती आवश्यक आहे.