मी गोमूत्र नियमितपणे घेतो, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर; नितेश राणेंचे विधान

    21-Apr-2025
Total Views |
 
Nitesh Rane
 (Image Source : Internet)
मुंबई:
राज्यातील मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक विधान केलं आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभू àमीवर त्यांना विचारण्यात आलं की, "तुम्ही रुह अफजा की गुलाब शरबत प्राधान्याने पिता?" यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, “मी रोज गोमूत्र घेतो. ते शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.”
 
नितेश राणे म्हणाले, “माझ्यासाठी रुह अफजा किंवा गुलाब शरबत कोणी आणणार? मला कोणीही प्रेमाने हे पेय देईल असं मला वाटत नाही. रुह अफजा मला आवडतही नाही कारण ते फार गोडसर असतं. त्याऐवजी मी गोमूत्रावर अधिक विश्वास ठेवतो.”
 
रामदेव बाबांचं ‘सरबत’ वादग्रस्त विधानही पुन्हा चर्चेत-
याआधी योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील सरबत विषयावर वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, “जर तुम्ही सरबत पित असाल तर मशीद आणि मदरशा उभे राहतील, पण जर तुम्ही पतंजलीचं पेय घेतलं तर तुम्ही गुरूस्थानी पोहचाल.” त्यांनी 'सरबत जिहाद' सारखी संकल्पना मांडत खळबळ उडवून दिली होती. मात्र, या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
 
राजकीय भूमिकेबाबत नितेश राणेंचा खुलासा-
पुढे बोलताना नितेश राणे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केलं. “आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ३९ वर्ष होतो. उद्धव ठाकरे यांच्याकडून जर विश्वासघात झाला नसता, तर आजही आम्ही गर्वाने शिवसैनिक म्हणून उभे राहिलो असतो,” असं ते म्हणाले.
 
“आम्ही काँग्रेसमध्ये गेलो होतो, पण आमचं रक्त नेहमीच भगवं राहिलं. आता भाजपमध्ये असल्याचा आम्हाला अभिमान आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.हिंदुत्व आणि राजकारणाच्या संदर्भात राणेंचं आक्रमक विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.