(Image Source : Internet)
नागपूर :
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अमेरिकेतील विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. वारंवार निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राहुल गांधींच्या बोलण्यात स्थैर्य राहिलं नसून, ते परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७.३० या दरम्यान ६५ लाख नागरिकांनी मतदान केल्याचा संशयास्पद दावा त्यांनी केला. यामुळे देशभरात चर्चेला उधाण आले.
फडणवीस म्हणाले, या प्रकारचे आरोप हे अत्यंत दुर्दैवी आहेत. देशाच्या निवडणूक यंत्रणेवर परदेशातून शंका घेतल्याने भारताची बदनामी होते. ही लोकशाहीत आस्था नसल्याची लक्षणं आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येते.
ते पुढे म्हणाले की, जनतेत जाऊन काम करा, विश्वास संपादित करा हेच यशाचे खरे सूत्र आहे. परदेशात जाऊन आपल्या देशाविरुद्ध बोलून कोणतीही सहानुभूती मिळणार नाही. उलट, अशा वक्तव्यांमुळे त्यांच्या नेतृत्वावरच शंका घेतली जाते.
फडणवीसांनी स्पष्ट केलं की, पराभव स्वीकारण्याऐवजी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणं ही अत्यंत अपरिपक्व आणि लहान मुलासारखी वागणूक आहे. “देशभक्त कधीच परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करत नाही. राहुल गांधी यांनी देशात राहून जनतेशी संवाद साधावा, आणि भारताची बदनामी करणं थांबवावं,” असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला.