राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

    21-Apr-2025
Total Views |
 
Aditya Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा – ठाकरे बंधू पुन्हा एका व्यासपीठावर दिसणार का? मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिल्याने या राजकीय समीकरणांची शक्यता वाढली आहे.
 
या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर त्यांनी फार थोडक्यात आणि नेमकं उत्तर दिलं. वरळीतील दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितलं, “जे काही बोलायचं होतं, ते पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे माध्यमांद्वारे मांडले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेगळं मत मांडण्याची गरज नाही.”
 
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी युतीच्या शक्यतेविषयी बोलताना सांगितलं की, आमच्यातील वाद किंवा मतभेद फारसे महत्त्वाचे नाहीत. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. “महाराष्ट्राचं भलं महत्त्वाचं आहे, व्यक्तिगत मतभेद गौण आहेत,” असं सूचक विधान त्यांनी केलं.
 
उद्धव ठाकरेंनी दिला ठाम प्रतिसाद
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिसाद देताना म्हटलं की, “मी भांडणं मिटवून टाकली आहेत. पण एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर तो तात्पुरता किंवा दिखावा नको. महाराष्ट्राच्या हितासाठी मी तयार आहे, पण पुढे भेटाभेटीचं राजकारण चालणार नाही.”
 
या राजकीय हालचालींमुळे ठाकरे कुटुंबाच्या संभाव्य पुनर्मिलनाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून, आगामी काळात या घडामोडी कोणता वळण घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.