(Image Source : Internet)
नागपूर:
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूरसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. औद्योगिक विकास संघ (AID), नागपूरच्या विनंतीनंतर गडकरी यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या पुनर्बांधणीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता विमानतळ 24x7 कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर, औद्योगिक विकास संघाचे अध्यक्ष आशीष काले यांनी नागपूरहून दक्षिण-पूर्व आशियातील प्रमुख ठिकाणांसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
ही मागणी नवीन नाही. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये दिल्लीतील बैठकीतही गडकरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्या वेळी धावपट्टीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्यामुळे विमानसेवा मर्यादित होत्या.
व्यापार आणि औद्योगिक विकासाला मिळणार गती-
नागपूर वेगाने एक प्रमुख व्यापार आणि औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. TCS, पर्सिस्टंट सिस्टम्स, ग्लोबल लॉजिक, HCL टेक्नोलॉजीज, टेक महिंद्रा, अॅक्सेंचर आणि इन्फोसिससारख्या आयटी कंपन्यांचे कार्यालये येथे कार्यरत आहेत. यामुळे दक्षिण-पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनशी थेट हवाई संपर्क वाढल्यास आर्थिक विकासाला चालना मिळेल, परदेशी गुंतवणूक (FDI) आकर्षित होईल आणि नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील.
याशिवाय, नागपूरमध्ये नुकतेच 7 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. परनोड रिकार्ड, अवाडा ग्रुप आणि कोरियन ग्रुपसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विदर्भात आपले ऑपरेशन्स सुरू केले आहेत. त्यामुळे नागपूरहून मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसाठीच्या देशांतर्गत हवाई संपर्कातही सुधारणा करणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेऊन गडकरी यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांना देखील पत्र लिहून या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली आहे.