ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढतेय; उद्धव-राज यांचा हातमिळवणीचा फोटो ठाकरे गटाकडून शेअर

    19-Apr-2025
Total Views |
 
Raj Uddhav Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई:
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील दुरावा कमी होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. अलीकडेच राज ठाकरेंनी एका मुलाखतीत “महाराष्ट्राच्या हितासाठी भूतकाळ विसरून एकत्र यायला हवं” असं मत व्यक्त केलं.
“आपल्यातले मतभेद गौण आहेत, पण महाराष्ट्राचं भवितव्य मोठं आहे,” असं सांगत राज ठाकरेंनी सहकार्याचा सूर लावला. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची अट स्पष्ट केली. “ज्यांनी महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेतली, अशा लोकांशी हातमिळवणी न करण्याची शपथ घेतल्यावरच सहकार्याचा विचार केला जाईल,” असं ते म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र असलेला जुना फोटो शेअर करण्यात आला असून, त्यासोबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया देणारा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत म्हटलं की, “महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातकडे जात असताना जर एकत्र येऊन विरोध केला असता, तर परिस्थिती वेगळी असती.”
“lमराठी माणसाच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे,” असं ठाम मत उद्धव ठाकरेंनी मांडलं. मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपल्या अटीवर ठाम राहात सांगितलं की, “जे महाराष्ट्राच्या विरुद्ध गेले, त्यांचं समर्थन करणं शक्य नाही. अशा व्यक्तींशी हातमिळवणी न करण्याची शिवाजी महाराजांच्या नावाने शपथ घेतल्यावरच सहकार्याचा विचार होईल.
एकंदरीत, ठाकरे बंधूंमध्ये वाढणारी जवळीक आणि एकत्र येण्याचे संकेत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. आता हे नातं प्रत्यक्ष कृतीत कधी आणि कसे उतरते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील.