(Image Source : Internet)
पुणे:
गर्भवती तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 106(1) अंतर्गत ही नोंद झाली असून, ससून रुग्णालयाच्या तपासणी अहवालात वैद्यकीय दुर्लक्षाचे ठोस पुरावे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय समितीचा दुसरा तपशीलवार अहवाल पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या अहवालात डॉ. घैसास यांच्याकडून उपचारादरम्यान गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय प्रशासनाला काही विशिष्ट प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरं देताना अहवालात वैद्यकीय गोंधळ व विलंब झाल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळेच डॉ. घैसास यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, “रुग्णाच्या प्रकृतीबाबत गंभीर संकेत असूनही तातडीची कृती करण्यात आली नाही. बी. जे. मेडिकल कॉलेजने सादर केलेल्या अहवालात याचा स्पष्ट उल्लेख आहे.”
या प्रकरणाचा पुढील तपास कायदेशीर प्रक्रियेनुसार केला जात असून, संबंधित डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जातील आणि आवश्यक ते पुरावे गोळा केले जातील.
दरम्यान, तनिषा भिसे या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. २१ मार्च २०२५ रोजी त्यांना इंदिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती खालवल्याने २८ मार्चला त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. घैसास यांच्यावर पूर्वी उपचार घेतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तब्बल साडेपाच तास कोणतीही आवश्यक वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर असून, सत्य निष्पन्न होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.