(Image Source : Internet)
मुंबई :
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. या दोघांमधील दूर गेलेल्या नात्याला नवा वळण मिळू शकतो, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. जर हे दोघं एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरेल, असं मत विरोधी नेत्यांनी नोंदवलं आहे.
दरम्यान, शिंदे गटातील काही नेत्यांनी मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा या विषयावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते चांगलेच संतापले. सध्या साताऱ्याच्या दरेगाव या त्यांच्या मूळ गावी असलेल्या शिंदेंनी, “कामाचे प्रश्न विचारा. राजकारणात हे सगळं नेहमीच असतं. दुसरं काही दिसतं का तुम्हाला?” असं म्हणत पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे सूचक संकेत-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी बोलताना, “आमचं भांडण अगदी किरकोळ आहे. महाराष्ट्र मोठा आहे,” अशा शब्दांत संभाव्य युतीची शक्यता नाकारली नाही. त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खासदार संजय राऊत यांनी, “आम्ही या संकेतांकडे सकारात्मकतेने पाहतो. दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल,” असं स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट-
उद्धव ठाकरे यांनीदेखील, “माझ्याकडून कधीही भांडण नव्हतं. मी जुनी मतभेद बाजूला ठेवण्यास तयार आहे,” असं म्हणत युतीच्या चर्चेसाठी दरवाजे उघडे असल्याचं सूचित केलं आहे. मात्र त्यांनी युतीसाठी काही अटीही स्पष्ट केल्या आहेत – देशद्रोह्यांना जवळ करायचं नाही, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचं नाही, त्यांच्या प्रचारात भाग घ्यायचा नाही, अशा अटी त्यांनी मांडल्या.