नागपूर शिक्षक भरती घोटाळा; ५४० बनावट शालार्थ आयडींमुळे ५४०० कोटींचा अपहार

    18-Apr-2025
Total Views |
 
teacher recruitment scam
 (Image Source : Internet)
नागपूर:
विदर्भातील शिक्षण विभागात एका भीषण गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल ५४० बनावट शिक्षक आयडी तयार करून २०१९ पासून शासकीय निधीचा अपहार केल्याचे उघड झाले असून, अंदाजे ५४०० कोटी रुपयांची लूट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
या घोटाळ्याची तक्रार शिक्षण विभागाने दाखल केली असून, तपासात आणखी काही अधिकाऱ्यांची संलिप्तता समोर येण्याची शक्यता आहे.
 
अपर पोलीस आयुक्त (एसीपी) लोहित मतानी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, १२ मार्च रोजी प्राप्त तक्रारीनंतर चौकशीला सुरुवात झाली. त्यानुसार, शिक्षण विभागाच्या प्रणालीत ५४० खोटे शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते आणि या आयडींच्या आधारे पगार देण्यात आले.
 
एसीपी मतानी यांनी यासंदर्भात पुढे सांगितले की, “एनआयसी आणि महाआयटीच्या सर्व्हरवरील माहितीची मागणी करण्यात आली आहे. बनावट आयडी तयार करण्यासाठी कोणते संगणक व आयपी पत्ते वापरण्यात आले, याचा शोध घेतला जात आहे.”
या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नारद यांच्यावर संशय असून, त्यांच्या कार्यालयातूनच बोगस आयडी तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. काही बनावट शिक्षक प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतानाही त्यांना पगार दिला गेला असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
 
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही आयडी बाहेरून तयार करून विभागीय प्रणालीत समाविष्ट करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड व लॉगिन आयपी तपासले जात असून, लवकरच आणखी अटकसत्र राबवले जाऊ शकते.
 
शिक्षकांची भरती प्रक्रिया ही शाळा, उपसंचालक, आणि पेरोल विभागामार्फत शालार्थ आयडी निर्माण करून पुढे जाते. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
 
शिक्षण व्यवस्थेतील विश्वासाला तडा देणाऱ्या या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून, जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची मागणी आहे.