नागपूर शिक्षण भरती घोटाळा; बनावट कागदपत्र प्रकरणात आणखी पाच तक्रारी

    18-Apr-2025
Total Views |
- चौकशीत नवे अधिकारी रडारवर

Nagpur education(Image Source : Internet) 
नागपूर:
मुख्याध्यापक पदासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर करून नियुक्ती घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदर पोलीस ठाण्यात यासंबंधी नव्याने पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटकेत असलेल्या पाच अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली असून, चौकशीत काही नव्या अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 
बुधवारी पोलिसांनी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक नीलेश मेश्राम, मुख्याध्यापक पराग पुडके, उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली असली तरी न्यायालयाने ती फेटाळून सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
 
या चौकशीत मेश्राम, पुडके व दुधाळकर यांच्याकडून काही महत्त्वाचे खुलासे झाले असून, त्यात काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे संकेत मिळाले आहेत. लवकरच या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. अद्याप या नव्या अधिकाऱ्यांची नावे पोलिसांनी अधिकृतपणे उघड केलेली नाहीत.