(Image Source : Internet)
पुणे :
राज्यातील शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात हिंदी (Hindi) अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय वादंग सुरू झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसने यावर आक्रमक भूमिका घेत, या निर्णयाला "मराठी अस्मितेवर आघात" असे संबोधले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करत स्पष्ट केले आहे की, मराठी ही आपल्या अस्मितेची भाषा असली, तरी हिंदी आणि इंग्रजी हे भाषाज्ञान आजच्या युगात तितकेच महत्त्वाचे आहे.
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा अवगत असलीच पाहिजे. मात्र, देश व विदेशात संवाद साधण्यासाठी हिंदी व इंग्रजी यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही भाषांचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे.”
हिंदीविरोधावर अप्रत्यक्ष टोला-
हिंदीला विरोध करणाऱ्यांवर टीका करत पवार म्हणाले, “काही लोक हिंदी ही राष्ट्रीय भाषा असल्याचा दावा करतात, तर काहीजण त्यावर आक्षेप घेतात. मी त्या वादात पडणार नाही. परंतु ज्यांच्याकडे काहीच काम नाही, तेच असे निरर्थक मुद्दे उचलून धरतात.”
मराठीला अग्रक्रम, पण इतर भाषाही शिका-
“दुनियेत बहुतेक ठिकाणी इंग्रजीचा वापर केला जातो. त्यामुळे इंग्रजीसुद्धा येणे काळाची गरज आहे. मात्र, आमची मातृभाषा मराठी हीच आमच्यासाठी प्रथम क्रमांकावर आहे आणि ती कायम राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडे मुद्द्यांचा अभाव-
पवार म्हणाले, सध्या विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे ते जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे वाद निर्माण करत आहेत. राज्यात सध्या उष्णतेची लाट, सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि हीट स्ट्रोकसारखे गंभीर प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.