नागपूर 'पीएम सूर्य घर' योजनेत राज्यात आघाडीवर, २६ हजार घरांवर सोलर प्रकल्प

17 Apr 2025 20:11:43
 
PM Surya Ghar scheme
 (Image Source : Internet)
नागपूर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या ‘पीएम सूर्य घर (PM Surya Ghar) मोफत वीज योजने’ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २६,५८८ घरांवर सौर प्रकल्प उभारण्यात आले असून, त्याद्वारे १०५.४५ मेगावॅट क्षमतेची वीज निर्माण होत आहे.
 
या योजनेचा उद्देश दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरांना मोफत वीज पुरवणे तसेच उरलेली वीज विकून नागरिकांना उत्पन्न मिळवून देणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
 
राज्यभरात आतापर्यंत १,७९,७५३ घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, त्यांची एकत्रित वीज उत्पादन क्षमता ६५१.४२ मेगावॅट इतकी आहे. यामध्ये नागपूरचा वाटा सर्वाधिक असून, राज्यातील एकूण प्रकल्पांपैकी १४.७९ टक्के प्रकल्प आणि १६.४२ टक्के वीज निर्मिती नागपूर जिल्ह्यातून होत आहे.
 
सोलर पॅनल्समुळे घरासाठी आवश्यक वीज निर्माण होतेच, शिवाय उरलेली वीज महावितरणला विक्री करून नागरिक आर्थिक लाभ देखील घेत आहेत. केंद्र सरकारकडून प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अनुदान देण्यात येते.१ किलोवॅटसाठी ३०,००० रुपये, २ किलोवॅटसाठी ६०,००० रुपये आणि ३ किलोवॅटसाठी ७८,००० रुपये. याशिवाय महावितरणकडून नेट मीटर देखील मोफत दिले जाते.
 
१३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. १६ एप्रिल २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यात तब्बल २६,५८८ सौर प्रकल्प बसवले गेले असून, केवळ १६ एप्रिल रोजीच २१२ नवीन घरांवर सौर पॅनल्स लावण्यात आले.
Powered By Sangraha 9.0