कामठीजवळ रेल्वे रुळांवर युवकाचा मृतदेह सापडला!

17 Apr 2025 17:11:27
- प्रवासादरम्यान ट्रेनमधून घसरून पडल्याचा प्राथमिक संशय

dead body(Image Source : Internet) 
नागपूर :
कामठी (Kamptee) रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर नागपूर ते हावडा मार्गावरील रुळावर रनाळा परिसरातील शहीद नगरजवळ, गुरुवारी पहाटे एका युवकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
मृत युवकाची ओळख ईश्वर नरेंद्र कोतुलवार (वय २२) असे झाली असून तो नागपूरच्या इंदौरा परिसरातील बाबा बुद्धजी नगर येथील रहिवासी आहे. सध्या रायपूरमध्ये काम करणारा ईश्वर, काही दिवसांपूर्वीच कुटुंबाला भेटण्यासाठी नागपूरमध्ये आला होता. गुरुवारी पहाटे तो परत रायपूरला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरने नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्सप्रेसने प्रवास सुरू केला होता. मात्र, प्रवासादरम्यान कोणत्या तरी क्षणी ट्रेनमधून तो खाली पडल्याची शक्यता आहे. सकाळी सुमारे पाच वाजता त्याचा मृतदेह ट्रॅकवर आढळून आला.
 
घटनेची माहिती मिळताच कामठी पोलीस व फॉरेन्सिक पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा करून तो कामठी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.
 
युवकाचा मृत्यू अपघाती आहे की यामागे अन्य कोणतीही कारणे आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0