उमरेड एमएमपी कंपनी स्फोट प्रकरण; आणखी एका मजुराचा मृत्यू

    16-Apr-2025
Total Views |
 
Umred MMP Company
 (Image Source : Internet)
नागपूर :
उमरेड (Umred) एमआयडीसीतील एमएमपी कंपनीत ११ एप्रिल रोजी झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर मृतांचा आकडा वाढतच आहे. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान करण तुकाराम शेंडे (वय २०) याने अखेरचा श्वास घेतला. नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही.
 
या दुर्घटनेने शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करणचा मोठा भाऊ, निखिल तुकाराम शेंडे (वय २५), याचा मृत्यू स्फोटाच्या दिवशीच झाला होता. काहीच दिवसांच्या फरकाने दोन मुलांना गमावण्याचे दुःख सहन करताना त्यांच्या पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या मूळ गावी, गोंडबोरी येथे शोककळा पसरली असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
 
या स्फोटात एकूण १३ कामगार जखमी झाले होते. त्यातील तिघांचा मृत्यू घटनास्थळीच झाला होता, तर आणखी दोन मजुरांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. करणच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. उर्वरित आठ जखमींवर सध्या उपचार सुरू असून, एका मजुराची स्थिती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अन्य सहा मजुरांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
 
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मजूर संघटनांकडून कारखान्यावर सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे. या घटनेने औद्योगिक सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.