नाशिकमध्ये शिंदे गटाला जबर धक्का;'या' महिला नेत्यानी सोडली पक्षाची साथ

16 Apr 2025 15:09:38
 
Shinde party
 (Image Source : Internet)
 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सहा वेळा नगरसेवक राहिलेल्या आणि नुकत्याच काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली आहे. केवळ दोन महिन्यांतच त्यांनी शिंदे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
डॉ. पाटील यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करत शिंदे गटातून बाहेर पडल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, पक्षात राहून मी पक्षाला न्याय देऊ शकत नाही.काँग्रेसमध्ये 30-35 वर्षे सक्रिय राहिल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारीवरून नाराज झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस सोडताना त्या भावनिक झाल्या होत्या. आता त्या कोणत्याही राजकीय पक्षात न राहता सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का – माजी आमदार घाटगे भाजपमध्ये
दरम्यान, कोल्हापुरातही राजकीय उलथापालथ घडली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करत मोठा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना साथ दिली होती. या पाठिंब्यामुळे मुश्रीफ सहज विजयी झाले आणि त्यानंतर घाटगे यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळाले. आता त्यांनी अधिकृतपणे ठाकरे गटाची साथ सोडून भाजपचा कमळ हाती घेतले आहे.
 
दरम्यान नाशिक आणि कोल्हापुरातील या घडामोडीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकांआधीच अशा प्रमुख नेत्यांचे निर्णय स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार हे निश्चित आहे.
Powered By Sangraha 9.0