एनडीएला मोठा धक्का ; 'या' पक्षाने केली संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा

    15-Apr-2025
Total Views |
 
Rashtriya Lok Janshakti Party
 (Image Source : Internet)
पाटणा :
बिहारच्या राजकीय वर्तुळात हालचाल वाढली असून, राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (RLJP) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी एनडीए आघाडीसोबतचे संबंध समाप्त करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
 
पारस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एनडीएसोबतचा आमचा प्रवास इथेच संपतो. आम्ही युतीचे निष्ठावान भागीदार होतो, पण वेळोवेळी आमच्या पक्षाची उपेक्षा झाली. आमचा पक्ष हा दलितांच्या हक्कासाठी लढणारा असून, आमच्यावर अन्याय होत असल्याची जाणीव सतत झाली.
 
नितीश सरकारवर गंभीर आरोप-
पारस यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ही सरकार पूर्णपणे दलितविरोधी आणि जनविरोधी आहे. ना विकास, ना न्याय, केवळ राजकीय स्वार्थासाठी निर्णय घेतले जातात,”असा घणाघात त्यांनी केला.
 
राजकीय पर्याय खुले-
पारस यांनी आगामी राजकीय दिशा स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही आता स्वतंत्र निर्णय घेणार आहोत. जो पक्ष आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना सन्मान देईल, त्याच्यासोबत आघाडीचा विचार होऊ शकतो. महाआघाडीकडून जर योग्य प्रस्ताव आला, तर आम्ही चर्चा करू.”
 
रामविलास पासवान यांना भारतरत्नसाठी आग्रही मागणी-
पारस यांनी दिवंगत नेते रामविलास पासवान यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी जोरदार मागणी केली. “त्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले, त्यांना हे मानचिन्ह मिळालेच पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
स्वतंत्र निवडणुकीची तयारी सुरू-
रालोजपाने आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, संपूर्ण बिहारमधील 243 विधानसभा मतदारसंघांत पक्ष आपली ताकद दाखवणार आहे. पारस म्हणाले, आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन जनतेशी थेट संपर्क साधतील. संघटना अधिक बळकट करून आम्ही मैदानात उतरू.या निर्णयामुळे बिहारमधील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.