पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

    15-Apr-2025
Total Views |
 
petrol
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली;
देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली असून भारतात कच्च्या तेलाच्या आयात किमतीत गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
सध्या भारतात कच्च्या तेलाची सरासरी आयात किंमत प्रति बॅरल ६९.३९ डॉलर इतकी आहे, जी २०२१ नंतरची सर्वात नीचांकी पातळी मानली जात आहे. याच कालावधीत मागील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये ही किंमत ८९.४४ डॉलर होती. त्यामुळे एका वर्षात तब्बल २२% घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
जागतिक मंदी, अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचे पडसाद, तसेच आर्थिक अनिश्चितता या कारणांमुळे कच्च्या तेलाच्या जागतिक मागणीत घट झाली असून, दर पुढेही कमी राहण्याची शक्यता एचटी आणि रॉयटर्सच्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आली आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८७% तेल आयात करतो. तेल शुद्धीकरण प्रक्रियेत कच्च्या तेलाचा खर्च ९०% पर्यंत असतो. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घसरल्यास, त्याचा थेट परिणाम देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर होऊ शकतो.
 
सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार?
कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट ही सरकारसाठी आणि ग्राहकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते. यामुळे इंधन दरात कपात होऊन महागाईवर मर्यादा येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर अंतिम निर्णय घेतल्याशिवाय दरांमध्ये प्रत्यक्ष बदल होणार की नाही, हे पाहावे लागेल.