शरद पवार गटाला ठाण्यात मोठा धक्का; 'हा' बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

    15-Apr-2025
Total Views |
 
Sharad Pawar
 (Image Source : Internet)
ठाणे :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) साठी ठाणे जिल्ह्यातून एक मोठी राजकीय उलथापालथ घडणार आहे. शहापूर मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा हे आज भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष मुख्यालयात दुपारी ३ वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे.
 
यावेळी पांडुरंग बरोरा यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
 
राजकीय प्रवास आणि पार्श्वभूमी:
पांडुरंग बरोरा यांनी २०१४ मध्ये आमदारकीची निवडणूक जिंकून विधानसभेत प्रवेश केला होता. मात्र, २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. २०२४ च्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली होती, पण ते अवघ्या १३०० मतांनी पराभूत झाले.बरोरा यांना राजकारणाचा वारसा लाभला असून, त्यांचे वडील महादू बरोरा हे शहापूरचे चार वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले होते. त्यामुळे शहापूर भागात बरोरा कुटुंबाचा प्रभाव आहे.
 
पक्षांतराचं राजकारण रंगतंय:
राज्यात सध्या पक्षफोडीचे राजकारण गतीमान झाले आहे. अनेक माजी आमदार आणि पदाधिकारी भाजपकडे वळताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे आणि अंबरिश घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेशाची तयारी दर्शवली होती.आज पांडुरंग बरोरा यांचाही प्रवेश भाजपच्या 'कमळ'कडे होणार असून, या घडामोडीमुळे शरद पवार गटाची ताकद कमी तर भाजपची भर वाढणार, असे स्पष्ट दिसत आहे.