लाडकी बहीण योजनेला मर्यादा; आठ लाख महिलांना आता फक्त ५०० रुपये मिळणार!

15 Apr 2025 14:45:18
 
ladaki bahen yojana
 (Image Source : Internet)
मुंबई:
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने महिलांसाठी लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेत (Ladki Bhaeen Yojana) मोठा फेरबदल झाला असून, सुमारे ८ लाख महिलांना या योजनेचा लाभ पूर्ण स्वरूपात मिळणार नाही.
 
या महिलांची नावे आधीच नमो शेतकरी सन्मान योजनेत लाभार्थी म्हणून नोंदलेली असल्याने, त्यांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांऐवजी आता केवळ ५०० रुपये मिळतील.
 
लाडकी बहीण योजनेचे नियम असे सांगतात की, एकाच महिलेला एकावेळी दोन शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे 'नमो' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे यामध्ये कपात करण्यात आलेली आहे.
 
'नमो शेतकरी सन्मान योजने'तून महिलांना राज्य सरकारकडून दरवर्षी ६ हजार, तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून आणखी ६ हजार रुपये मिळतात. म्हणजे एकूण मिळकत १२ हजार रुपये वर्षाला होते.
 
पण आता, अशा लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतून फक्त ६ हजार रुपये, म्हणजे दरमहा फक्त ५०० रुपयेच मिळतील.
महाराष्ट्र सरकारने २०२३ मध्ये सुरू केलेल्या 'नमो' योजनेनुसार शेतकऱ्यांना चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात.
या नव्या बदलामुळे हजारो महिलांच्या आर्थिक सहाय्याची रक्कम कमी झाल्याने नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
Powered By Sangraha 9.0