महाराष्ट्रात सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 35 जणांविरोधात गुन्हे दाखल, १४ जणांना अटक !

    15-Apr-2025
Total Views |
 
Drug racket
 (Image Source : Internet)
तुळजापुर :
राज्याच्या श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीच्या नगरीत अमली पदार्थांच्या रॅकेटचा मोठा खुलासा झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तब्बल 10 हजार पानांचे तपशीलवार आरोपपत्र तामलवाडी पोलिसांनी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती केवळ तुळजापुरापुरती मर्यादित न राहता, मुंबई, पुणे आणि सोलापूरसारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचली आहे.
 
तपासाच्या 60 व्या दिवशी दाखल झालेल्या या आरोपपत्रात आरोपींचे जबाब, कॉल डिटेल्स, पंचनामे आणि घटनास्थळाची सखोल माहिती समाविष्ट आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आतापर्यंत 14 जणांना अटक केली असून, 21 आरोपी अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे 80 व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली आहे, जेणेकरून त्यांची चौकशी करता येईल.
 
15 फेब्रुवारी रोजी तामलवाडी गावात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि त्यातून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली. यातून ड्रग्ज पुरवठ्याचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचले. याच प्रकरणात मुंबईतून संगीता गोळे हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
या गुन्ह्यात काही धार्मिक सेवकांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले असून, त्यामुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. तपास अधिक प्रभावी होण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
हे संपूर्ण प्रकरण धार्मिक नगरीत घडल्याने आणि स्थानिकांची श्रद्धा असलेल्या परिसरात अमली पदार्थांचा व्यवहार सुरू असल्याने लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असून, पुढील काळात आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.