(Image Source : Internet)
नागपूर :
शहरात मध्यरात्रीच्या संविधान चौकात उडालेल्या फटाक्यांनी आकाश उजळून निघाले. "जय भीम"च्या घोषणांनी शहरात एक उत्साही लहर उमटली. रविवारची रात्र जणू एका नवचैतन्याच्या सूर्यमालिकेचा आरंभ होता,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या १३४व्या जयंतीचा!
देशभरातून आलेल्या हजारो अनुयायांनी दीक्षाभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांना वंदन केले. सूर्योदयाच्या पहाटेपासूनच अनुयायांची रांग आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेली श्रद्धा, प्रेम, आणि आत्मिक समाधान पाहताच हे दृश्य एका आध्यात्मिक यात्रेसारखं वाटत होतं.
भाविकांची न थांबणारी रांग-
दीक्षाभूमीच्या दिशेने वाहणाऱ्या श्रद्धेच्या लाटांना कोणताही अडथळा नव्हता. वयोवृद्ध आजीपासून ते लहानग्या मुलांपर्यंत प्रत्येकजण बाबासाहेबांच्या अस्थी दर्शनासाठी रांगेत उभा होता .हातात फुलं, डोळ्यात भक्ती आणि मनात आदर.
तंत्रज्ञानाचाही वापर-
यंदाच्या कार्यक्रमात अनेक स्वयंसेवी संस्थांनी डिजिटल स्क्रीन, QR कोडद्वारे बाबासाहेबांची पुस्तके, भाषणे आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवले. सोशल मीडियावर #JaiBhim आणि #AmbedkarJayanti हे ट्रेंड होत होते.
तरुणांचा उत्साह-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य, घोषपरेड आणि 'संविधान चळवळ' या संकल्पनेवर आधारित काढलेल्या रॅलींनी वातावरण भारावून टाकलं. अनेकांनी 'मी संविधान वाचतो' असा उपक्रम राबवून संविधानाची उद्देशिका वाचली आणि इतरांनाही वाचायला उद्युक्त केलं.
विशेष पोलिस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांचं योगदान-
दीक्षाभूमी आणि चौकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वयंसेवकांनी गर्दी नियंत्रण, अपंग आणि वृद्धांसाठी विशेष सोयी, आणि पाण्याची व अन्नाची व्यवस्था उत्तमरित्या सांभाळली.
स्त्रीशक्तीचा प्रभावी सहभाग-
महिलांच्या सहभागानं विशेष लक्ष वेधले काहींनी 'आंबेडकरी महिला मंच'च्या वतीने गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा, आणि संविधान साक्षरता मोहीम राबवली.