पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

    14-Apr-2025
Total Views |
 
Mehul Choksi
 (Image Source : Internet)
मुंबई :
पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि अनेक वर्षांपासून फरार असलेला हिरा व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. चोक्सीने 13,850 कोटी रुपयांची फसवणूक करून भारतातून पलायन केल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.
 
ही अटक शनिवारी, 12 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली असून, चोक्सी सध्या स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला अटक करण्यात मुंबई न्यायालयाकडून 2018 आणि 2021 मध्ये जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटचा आधार घेण्यात आला आहे.
 
बँकांची फसवणूक आणि पलायन-
मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका दिला होता. या घोटाळ्यानंतर दोघेही देशाबाहेर पळाले होते. चोक्सीने बेल्जियममधील अँटवर्प शहरात आश्रय घेतला होता, जिथे तो आपल्या पत्नी प्रीतीसोबत राहत होता.
 
फसवणुकीप्रकरणी कारवाईला गती मिळणार -
चोक्सीवर CBI व ईडीने (ED) गुन्हे दाखल केले असून त्याच्याविरुद्ध फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत (FEOA) घोषणाही करण्यात आली आहे. ईडीने याआधीच त्याच्या 2,500 कोटींपेक्षा अधिक मूल्याच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. यामध्ये घरे, कार्यालये, कारखाने आणि हिरे-रत्नांचा समावेश आहे.
 
प्रत्यार्पण आणि न्यायालयीन प्रक्रिया-
सूत्रांच्या मते, चोक्सी सध्या आरोग्याच्या कारणांवरून जामिनासाठी प्रयत्न करतोय, मात्र भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या बहुचर्चित घोटाळ्याच्या चौकशीत नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.