(Image Source : Internet)
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिसारमध्ये आयोजित एका सभेत काँग्रेसवर (Congress) तीव्र हल्ला करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी काँग्रेसवर मुस्लिम समाजाबद्दल केवळ राजकीय लाभासाठी लांगूलचालन करण्याचा आरोप करत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, "जर काँग्रेसला मुस्लिम समाजाची इतकी काळजी असती, तर त्यांनी आजवर एखाद्या मुस्लिम नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षपदी का नेमलं नाही?"
मोदींनी आरोप केला की, काँग्रेसने मुस्लिम समाजाच्या वास्तविक समस्यांवर लक्ष देण्याऐवजी केवळ काही कट्टरपंथी गटांना खुश करण्यासाठी प्रतीकात्मक राजकारण केले. यामुळे मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वगळण्यात आलं आहे, असं ते म्हणाले. त्याच वेळी, मोदींनी वक्फ कायद्याचे उदाहरण दिलं आणि काँग्रेसच्या धोरणांमुळे सामाजिक असमतोल वाढला असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना, मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. बाबासाहेबांनी जे सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं, त्याचा काँग्रेसने पूर्णपणे अनादर केल्याचं त्यांनी सांगितलं. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संविधानाच्या आत्म्याला ठेस पोचवली, असा आरोप करत, मोदींनी म्हटलं की काँग्रेसने सत्ता टिकवण्यासाठी संविधानाच्या तरतुदींचा वापर फक्त राजकीय फायदे मिळवण्यासाठी केला.