(Image Source : Internet)
नागपूर (उमरेड) :
उमरेड Umred) एमआयडीसीमधील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या प्रचंड स्फोटामुळे एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ११ कामगार गंभीररित्या भाजले गेले असून त्यातील पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
मृत कामगारांच्या कुटुंबांना ६० लाखांची मदत-
स्फोटात मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना एकूण ६० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये कंपनीकडून ५५ लाख आणि शासनाकडून ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
जखमी, अपंग कामगारांसाठी ३० लाखांची सहाय्यता-
या घटनेत गंभीर जखमी होऊन काम करण्यास असमर्थ ठरलेल्या कामगारांसाठी ३० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च शासनाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. गरज असल्यास त्यांना उचच दर्जाच्या वैद्यकीय उपचारासाठी एअर अॅम्बुलन्सने हलवण्यात येईल.
कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीची संधी-
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या कामगारांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीची संधी दिली जाणार असून, त्यामुळे त्यांचा आर्थिक आधार टिकून राहणार आहे.
प्रशासनाची तात्काळ हालचाल, मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट-
घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अग्निशमन व सुरक्षा निरीक्षक यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन सविस्तर पाहणी केली. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून मदतीबाबत तात्काळ निर्णय घेतले.
दोषींवर कारवाई होणार, सुरक्षेच्या नियमांचे पालन बंधनकारक-
या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. यासोबतच भविष्यात अशा दुर्घटना टळाव्यात म्हणून सर्व उद्योगांनी सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही दिले.या दुर्घटनेनंतर सर्व संबंधित यंत्रणा आणि कंपनी एकत्रितपणे काम करत असून, पीडित कुटुंबांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही जबाबदारीने उचललेली भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.