(Image Source : Internet)
रायगड:
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांनी आपल्या रोखठोक आणि दिलखुलास शैलीत भाषण करत उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
"मीही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो,"असे ठामपणे सांगत त्यांनी हास्याचा माहोल निर्माण केला. मात्र, त्यामागे विनोद नव्हता, तर अनुभव आणि आत्मविश्वास होता, हे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या पाच वर्षांत मी 288 आमदारांचं सभागृह यशस्वीरित्या चालवलं. हीदेखील नेतृत्वाचीच परीक्षा होती, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
झिरवाळ पुढे म्हणाले की, नेतृत्व मिळाल्यावर ते जनतेच्या हितासाठी वापरणं गरजेचं आहे. केवळ पद न मिळवता, त्याचा उपयोग समाजासाठी करणं हेच खरं नेतृत्व. त्यांच्या या विचारांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
त्यांनी हेही अधोरेखित केलं की, राष्ट्रवादी पक्षामध्ये जाती-धर्मापेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य दिलं जातं. एखाद्या सामान्य कार्यकर्त्यालाही मोठी संधी मिळू शकते, जर त्याच्याकडे काम करण्याची क्षमता असेल.
या ठसकेबाज भाषणातून झिरवाळांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली –की गंभीर मुद्देही विनोदी शैलीत सहज आणि प्रभावीपणे मांडता येतात. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि मनात आत्मविश्वास निर्माण करत त्यांनी आपल्या भाषणाची प्रभावी छाप सोडली.