…म्हणून तहव्वूर राणाला भारतात आणले ; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

11 Apr 2025 14:15:01
 
Sanjay Raut
 (Image Source : Internet)
मुंबई :
मुंबईच्या 26/11 दहशतवादी हल्ल्याशी संबंधित तहव्वूर हुसैन राणा (Tahawwur Hussain Rana) याला भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात हलचल माजली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, राणाला भारतात फक्त राजकीय फायद्यासाठीच आणण्यात आले.
 
निवडणुकीसाठीच राणाचे प्रत्यार्पण -
संजय राऊत म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण वेगानं केले. या घटनेचा प्रचारात मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाणार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, राणा भारतात आणण्याची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळातच सुरू झाली होती, याचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये, अशी टीका त्यांनी केली.
 
अबू सालेम, नीरव मोदी, मेहुल चौकसीवरही भाष्य-
राऊत यांनी यावेळी पूर्वी अशाच पद्धतीने भारतात आणण्यात आलेल्या अबू सालेमचं उदाहरण दिले. त्याचबरोबर नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचे प्रत्यार्पणही त्वरित करून सरकारने कृतीशीलता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
जाधव प्रकरणावर आक्रमक भूमिका-
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील अन्यायाचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानने भारताविरोधात कट रचून जाधव यांना फाशी सुनावली आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक प्रभावी लढा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.दरम्यान एका आरोपीला भारतात आणल्याने मोठं यश मिळाले,असे दाखवू नये. ही देशहिताची बाब आहे, निवडणुकीसाठी वापरू नका,असा स्पष्ट संदेश संजय राऊत यांनी दिला. केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांनी सर्वच मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Powered By Sangraha 9.0