मंगेशकर कुटुंबावर टीका करणे दुर्दैवी; अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांना सुनावले

11 Apr 2025 17:25:40
 
Ajit Pawar slams Vijay Wadettiwar
 (Image Source : Internet)
पुणे :
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका रुग्णाच्या मृत्यूनंतर मंगेशकर कुटुंबावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबाला “लुटारूंची टोळी” म्हटल्याने अनेकांकडून निषेध नोंदवला जात आहे.
 
यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंगेशकर कुटुंबाचं योगदान संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगालाही माहिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर या सर्व भावंडांनी भारतीय संगीतविश्वात अमूल्य योगदान दिलं आहे. त्यांच्या कार्याबद्दल मराठी माणसाच्या मनात अभिमान आणि आत्मीयता आहे.”
 
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर अप्रत्यक्ष टीका करत अजित पवार म्हणाले, ज्यांनी गाणं म्हणण्यापलीकडे काही केले नाही, असे म्हणणं ही केवळ अज्ञानाची लक्षणं आहेत. प्रत्येकाने शब्द वापरताना जबाबदारीने वागायला हवं. समाजासाठी सेवा ही अनेक प्रकारे करता येते, आणि संगीताच्या माध्यमातून मंगेशकर कुटुंबाने समाजाला दिलेली कला ही सेवा नक्कीच आहे.
 
दरम्यान, मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातील तपास अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. संबंधित प्रकारावर राजकारण न करता, योग्य चौकशीद्वारे सत्य समोर यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0