- उत्पल पर्रीकरांनी स्वतः स्पष्ट केली भूमिका
(Image Source : Internet)
पणजी:
गोव्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, या चर्चांवर खुद्द उत्पल पर्रीकर यांनीच भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
एका खासगी युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उत्पल पर्रीकर यांनी सांगितले की, "सध्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत कोणतीही बोलणी सुरू नाहीत." ते पुढे म्हणाले, "नवीन प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी माझे चांगले वैयक्तिक संबंध आहेत. ते अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांच्याशी कुठल्याही वेळी चर्चा करू शकतो. त्यांनी जर अपेक्षेनुसार काम केले, तर आमच्या विचारांची जुळवाजुळव होऊ शकते.
भाजप सोडण्यामागे फक्त तिकीट नाकारण्याचे कारण नव्हते, हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, "मी पक्ष सोडला ते फक्त तिकीट नाकारल्यामुळे नव्हे. पोटनिवडणुकीसाठी मला तिकीट न मिळण्यामागे काही वरिष्ठ नेत्यांचा माझ्यावरील आणि माझ्या वडिलांविषयी असलेला रोष कारणीभूत होता. तरीही, त्या काळात ८० टक्के कार्यकर्ते माझ्या सोबत होते, असे एका ज्येष्ठ नेत्याने मला सांगितले.
पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या कामावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत सुमार दर्जाची आहे. मी आधीच यावर टीका केली होती. बाबुश यांना या कामासाठी जबाबदार धरायला हवे, असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी पणजी पालिकेतील नेतृत्व बदलण्याचीही गरज व्यक्त केली.
एकंदरच, उत्पल पर्रीकर यांनी भाजपमध्ये पुनर्प्रवेशाबाबतचे वृत्त फेटाळले असले तरी, भविष्यात काही अटींच्या अधीन राहून ते पुन्हा पक्षात सहभागी होऊ शकतात, असा राजकीय वर्तुळात कयास लावला जात आहे.