
(Image Source : Internet)
नागपूर :
शहरातील अमरावती रोडवरील वसंतराव नाईक झोपडपट्टीत बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे.
मृताचे नाव सागर शंकर मसराम (वय २७) असून, जखमीचा नाव लक्ष्मण आहे. चंदू नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सागर आणि लक्ष्मण हे आझम उर्फ अब्बू बेग या गुन्हेगाराचे निकटवर्तीय होते. काही दिवसांपूर्वी बेगने चंदूला धमकी दिली होती. त्यामुळे चंदूने पोलिसांत तक्रार केली होती. बुधवारी पोलिसांनी बेगला अटक केली.
अटक झाल्यानंतर बेगच्या सांगण्यावरून सागर आणि लक्ष्मण रात्री १० च्या सुमारास चंदूच्या घरी गेले. त्यांनी तेथे जाऊन चंदूला शिवीगाळ केली आणि वाद निर्माण केला. अचानक चंदूने घरातून काठी उचलून दोघांवर हल्ला केला. यात सागरचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला.
हल्ला केल्यानंतर चंदूने पळ काढला, पण पोलिसांनी रात्री उशिरा त्याला अटक केली. जखमी लक्ष्मणवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी पुढील तपास सुरु आहे.