औरंगजेबाच्या कबरीवरची सजावट काढा; राज ठाकरेंच्या मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

    01-Apr-2025
Total Views |
 
Raj Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या आपल्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेल्या राजकारणावर भाष्य केले. कबर उखडून टाकण्याऐवजी मराठ्यांचे स्वराज्य संपवायला महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी इथेच गाडला हा इतिहास आजच्या पिढीला कळवा यासाठी त्या कबरीवर शैक्षणिक सहली काढाव्यात, तिथे असलेली सजावट काढून 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला' असा फलक लावावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
 
मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात 30 मार्च रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणाचा संदर्भ देत औरंगजेबाच्या कबरीवरची सजावट काढा, अशी मागणी केली आहे. औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीजवळील सजावट त्वरित काढावी तसेच यापुढे या कबरीवर कुठलाही सरकारी खर्च करू नये. सर्व शाळातील मुलांच्या शैक्षणिक सहली येथे काढण्याचे आदेश द्यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत,असेही म्हटले आहे.
 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आमच्या संभाजी महाराजांना अमानुषपणे, क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाची कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार औरंगजेब नष्ट तर करू शकला नाही परंतु तो स्वत: इथे पवित्र भूमीत गाडला गेला. जो आमच्या धर्मावर उलटला होता, आमची मंदिरे पाडत होता, आमच्या आया बहि‍णींची अब्रू लुटत होता तो इथेच संपला, हा इतिहास आहे. अशा परिस्थितीत त्याच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती त्वरित काढून टाकण्यात यावी, असे पत्रात खांबेकर यांनी नमूद केले आहे.
 
येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फुल, चादर चढवण्यास येईल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात केली आहे. आमच्या मागणीचा विचार करून यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या पत्रात नमूद केले आहे.
 
ती नुसती कबर दिसली पाहिजे, तिथे यापुढे कुठलाही सरकारी खर्च होता कामा नये जसे की रंगरंगोटी, दुरुस्ती बांधकाम, काहीच नको. इथे एक बोर्ड लावण्यात यावा 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला'. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सहली तेथे आयोजित करण्यात याव्यात. जेणेकरून आमच्या पुढील पिढीला आणि जगाला हे कळले पाहिजे की, आम्ही कुणाला गाडला आहे, असेही खांबेकर पत्रात म्हणाले.