कुल्लूत दरड कोसळल्याने सहा पर्यटकांचा जागीच मृत्यू

    31-Mar-2025
Total Views |
 
Kullu
(Image Source : Internet) 
कुल्लू :
हिमाचल प्रदेशातील कुल्लू (Kullu) जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. मणिकर्ण येथील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली असून, अचानक कोसळलेल्या दरडीमुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
तर अनेक जण जखमी झाले. तसेच अनेक गाड्यांचे नुकसान झाले. रविवारी संध्याकाळी सुमारे पाचच्या सुमारास कुल्लू येथील मणिकर्ण मार्गावरील गुरुद्वाराजवळ भूस्खलनाची घटना घडली. त्या वेळी काही पर्यटक आणि स्थानिक लोक रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलेले असताना अचानक डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढीग खाली आला. या ढिगाऱ्याचा जोर झाडावर बसल्याने झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले आणि त्याखाली बसलेले लोक त्यात दाबले गेले.
 
या घटनेत एका स्टॉल चालकासह, सुमो गाडीत बसलेले दोन प्रवासी आणि तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
 
भूस्खलनामुळे मणिकर्णकडे जाणारा प्रमुख मार्ग बंद झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रस्त्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्यातील सहा जणांना मृत घोषित केले. अद्याप काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.